आज सहा ऑक्टोबर...
आकाशवाणी सांगली केंद्राचा वर्धापन दिन....
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....
आकाशवाणीचा चेहरा म्हणजे निवेदक..श्रोत्यांच्या समोर प्रामुख्यानं तोच असतो.माझ्या नोकरीच्या काळात आकाशवाणी सांगली वर मी पाच मुख्य निवेदक अनुभवले..प्रत्येकाच्या आवाजाचा बाज व प्रत वेगळी..निसर्गदत्त आवाजाला अनुरूप अशी त्यांची निवेदन शैली...भलती बाप माणसं...
मला त्यांचा सहवास लाभला, हे मी मोठं भाग्य समजतो.श्रोत्यांनी त्यांना डोकीवर घेतलं. जीवात मुरवलं.
आकाशवाणीच्या घडणीतले ते बांधीव चिरेच...
त्यातलं एक नाव,म्हणजे प्रभाकर वेलणकर..
अत्यंत तडफदार बोलणं.वाक्यांचे छोटे छोटे तुकडे करत,तोडून बोलल्यासारखे, क्रियापदाच्या जागा बदलत,प्रत्येक वेळी नवीच वाक्यरचना ते करत असंत.नितांतसुंदर आवाज..पलीकडं कुणीतरी खानदानी भरदार व्यक्ती बोलतेय,असा भास व्हायचा..भलंमोठं अक्षर.एका पानावर फक्त चार ओळी लिहायचे..वागणं फकिरीमस्तीत.. पुढच्यांन काहीही मत मांडावं, ते यांनी खोडून काढलच..""नाही नाही,माझं म्हणणंच असं आहे ""अशीच वाक्याची सुरवांत...दिलदार माणूस..नाट्यसंगीताच्या उद्घोषणा खूप सुंदर द्यायचे...
दुसरा स्मरणात राहिलेला आवाज,जयश्री हंचे यांचा..गोड मधाळ आवाज..स्वरात कमालीची मार्दवता..आत माजघरातल्या देव्हाऱ्यात,कुणी शांतपणे पूजा करतय,तिच्या हातातल्या बांगड्यांची नाजूक किणकिण तेवढी,वाऱ्यावर लहरत येतेय,असा त्यांना ऐकताना भास व्ह्यायचा....स्वरात सोज्वळ आदब आणि शालीनता...सप्रेम नमस्कार कार्यक्रमातील त्यांची ताई,म्हणजे जणू मायेची थोरली बहीण बोलतेय, असं वाटायचं........
प्रसारीत करीत आहोत,काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम ..प्रभातीचे रंग.......
ही छोटीशी ओळ..पण तिचं लयबध्द उच्चारण ऐकताना,अंगातून उत्साहाची लहर दौडायची.. ती वामन काळे यांच्या आवाजाची जादू होती..अत्यंत बेस असलेला आवाज,इतक्या खुबीनं वापरायचे की नुसतं ऐकत राहावं सांगली केंद्राचा आवाज म्हणजे त्यांचाच , ईतका प्रभाव लोकांवर...प्रभातचे रंग ला त्यांनी अफाट उंची मिळवून दिली, हे सत्यय..
चौथ्या माझ्या आवडत्या निवेदिका म्हणजे चित्रा हंचनाळकर.. स्वच्छ नितळ स्वर.लखलखीत..काहीसा धारदार.. श्रूतिकेमधील त्यांचा अवखळ उत्साही स्वर आणि झुंबर फुटल्यागत खळाळून मुक्त हसणं..व्वा..
बालसभा सादर करताना त्या मुलात मुल व्हायच्या..
अत्यंत सहृदयी आणि शिस्तबध्द...खूप साध्या..श्रोत्यांमध्ये लोकप्रिय..त्यांच्याच होवून राहिलेल्या..
दत्ता सरदेशमुख...........
आवाजावर मोठी हुकमत.. जणू पहाडच...
लवचिक ,आणि प्रचंड कमांड असणारा स्वर..
जसे स्क्रिप्ट तसा आवाजात बदल करायचे.. स्वताच्या आवाजावर मनस्वी प्रेम करणारे.. भाषेतल्या वळणावळणाचा सगळा ठिकाणा त्याना ठावूक..कादंबरी वाचन आणि नभोनाट्य म्हणजे सरदेशमुख.आवाजातली फिरकत न्यारीच.. अर्थपूर्ण पॉज सहज भिडायचे..कवेत न मावणारा प्रचंड ताकदीचा कलावंत.........
या सगळ्यांच्या सहवासातल्या खूप आठवणी आहेत..मर्यादा असतानाही आवाज कसा वापरावा हे त्यांच्याकडून घेण्यासारख..प्रत्येकाची शैली आणि धाटणी वेगळी. श्रोते अजूनही त्यांची आठवण काढतात.. आकाशवाणीला आज जी प्रतिष्ठा मिळाली आहे ती अशा कलाकारांमुळे..
माझ्या नजरेत ले हे बिनीचे शीलेदार...अशा अनेक कलावंतांनी आकाशवाणी समृद्ध केली आहे..
या पाच जणांचे,स्टुडिओत माईक समोर बोलत असलेले फोटो कोलाज करुन इथं पोस्ट करण्याची इच्छा होती..पण कुणाचाच तसा एकही फोटो मिळाला नाही..
मात्र थोडंसं आत डोकावून, चित्त, कानाशी नेलं की अजूनही त्यांचे स्वर ऐकु येतात..मन जुन्या आठवणीत उचंबळून येतं.... काळजाशी रेडिओ गुणगुणू लागतो....
--------------------------------------------------------------------
( संजय जगन्नाथ पाटील )
Source : Sanjay Patil